Lek Ladki Yojana Online Form 2025: महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना 2025 | पात्रता, अर्ज प्रक्रिया, लाभ व कागदपत्रे – संपूर्ण माहिती

Lek Ladki Yojana Online Form 2025 | मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार वेळोवेळी विविध योजना राबवत असते. त्यामधीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे लेक लाडकी योजना 2025. या योजनेअंतर्गत मुलगी जन्माला आल्यानंतर सरकारकडून रु.1,01,000 इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुलींच्या शिक्षणासाठी, संगोपनासाठी आणि भविष्यातील सुरक्षिततेसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

आज आपण येथे अफलातून.कॉम वर लेक लाडकी योजना 2025 अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, लाभ, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन फॉर्म भरायची संपूर्ण माहिती बघणार आहोत.

लेक लाडकी योजना 2025 काय आहे? (What is Lek Ladki Yojana 2025?)

  • महाराष्ट्र शासनाने राज्यातील मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी, तसेच मुलींच्या शिक्षणाला व प्रगतीला चालना मिळावी या उद्देशाने ही योजना जाहीर केली आहे.
  • योजनेअंतर्गत मुलगी जन्मल्यानंतर पालकांना ठराविक हप्त्यांमध्ये एकूण रु1,01,000 ची मदत मिळणार आहे.
  • ही रक्कम मुलीच्या नावाने बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

योजनेचा उद्देश काय आहे? (What is the Objective of the Lek Ladki Yojana 2025?)

महाराष्ट्रात अनेक मुलींचं शिक्षण आर्थिक अडचणींमुळे अर्धवट राहते आणि त्यामुळे त्यांचं लवकर लग्न केलं जातं. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने ‘लेक लाडकी योजना 2025’ सुरू केली आहे. या योजनेचा थेट फायदा पिवळं व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांना मिळणार आहे, ज्यामुळे मुलींचं शिक्षण पूर्ण होऊन त्यांचं भविष्य सुरक्षित होईल.

लेक लाडकी योजनेतून मिळणारा आर्थिक लाभ (Financial Benefits of Lek Ladki Yojana 2025)

या योजनेअंतर्गत मुलगी जन्मल्यानंतर रु.5,000 ची मदत दिली जाईल. त्यानंतर मुलगी शाळेत दाखल झाल्यावर रु.4,000, सहावीत गेल्यावर रु.6,000, तर अकरावीमध्ये प्रवेश घेतल्यावर रु.8,000 इतकी रक्कम मिळेल. मुलगी जेव्हा 18 वर्षांची होईल, तेव्हा राज्य सरकारकडून थेट रु.75,000 रुपये बँक खात्यात जमा केले जातील. अशा प्रकारे मुलीला एकूण रु.1,01,000 (एक लाख एक हजार रुपये) इतकी आर्थिक मदत मिळणार आहे.

Lek Ladaki Yojana Benifits

लेक लाडकी योजनेतील अटी आणि शर्ती (Lek Ladki Yojana 2025 Eligibility Criteria)

‘लेक लाडकी योजना 2025’ अंतर्गत लाभ घेण्यासाठी खालील अटी व शर्ती लागू राहतील:

1) पात्र कुटुंबे

  • फक्त पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका (Ration Card) धारक कुटुंबांना ही योजना लागू राहील.
  • योजना फक्त 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या एका किंवा दोन मुलींना लागू असेल.
  • जर कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल, तर मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.

2) कुटुंब नियोजनाची अट

  • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
  • दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एका किंवा दोन्ही मुलींना योजनेचा लाभ मिळेल. मात्र त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
  • जर 1 एप्रिल 2023 पूर्वी कुटुंबात एक मुलगा आणि मुलगी असेल, आणि त्यानंतर जन्मलेली मुलगी / जुळ्या मुलींनाही योजना लागू राहील. परंतु या वेळीही पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.

3) रहिवासी व बँक अट

  • लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे बंधनकारक आहे.

4) उत्पन्न मर्यादा

  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1,00,000 पेक्षा जास्त नसावे.

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Lek Ladki Yojana 2025 Documents List)

  1. लाभार्थीचा जन्माचा दाखला
  2. कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. (वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावं.) यासाठी तहसिलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
  3. लाभार्थीचे आधार कार्ड
  4. पालकांचे आधार कार्ड
  5. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
  6. रेशनकार्ड
  7. मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्षे पूर्ण झाल्यानतंर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला.)
  8. संबंधित टप्प्यातील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा शाळेचा दाखला.
  9. पालकांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
  10. अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे. (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र)

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे मिळेल? (Lek Ladki Yojana 2025 Application Form)

‘लेक लाडकी योजना 2025’ साठी आवश्यक अर्जाचे फॉर्म राज्यातील खालील शासकीय कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत.

  • प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय
  • जिल्हा कार्यक्रम अधिकारी कार्यालय
  • जिल्हा परिषद, महिला व बालविकास अधिकारी कार्यालय
  • विभागीय उपायुक्त – महिला व बालविकास कार्यालय

लाभार्थींनी अर्जाचा विहित नमुना व आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरून द्यावा. हा अर्ज अंगणवाडी सेविका भरून घेतील व पुढे तो अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्य सेविका यांच्याकडे सादर करावा लागेल. म्हणजेच अर्ज प्रक्रिया पूर्णपणे अंगणवाडी पातळीवरून सुरू होते आणि त्यानंतर संबंधित अधिकारी त्याची पडताळणी करतात.

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा भराल?

लेक लाडकी योजना 2025 साठी अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर झालेल्या जन्माची नोंद संबंधित ग्रामीण अथवा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेत करणे आवश्यक आहे. जन्म नोंदणी झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज अंगणवाडी सेविकेकडे सादर करावा. त्यानंतर अर्जाची छाननी केली जाते आणि जर अर्ज अपूर्ण असेल किंवा काही कागदपत्रे कमी असतील, तर अर्जदाराला 15 दिवसांच्या आत त्याची माहिती दिली जाते. पालकांनी 1 महिन्याच्या आत आवश्यक पूर्तता केली पाहिजे, तसे न झाल्यास वाढीव 10 दिवसांची मुदत मिळते. अशा प्रकारे संपूर्ण अर्ज प्रक्रिया जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत पूर्ण केली जाते आणि पात्र अर्जदाराला लेक लाडकी योजनेचा लाभ मिळतो.

लेक लाडकी योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 2025 (Lek Ladki Yojana Online Application Process 2025)

■ अर्ज नोंदणी प्रक्रिया

महाराष्ट्र सरकारने लाभार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन पोर्टल द्वारे करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

  • ग्रामीण भागात – लाभार्थ्यांचे अर्ज अंगणवाडी सेविका स्वीकारतील, तपासतील आणि पोर्टलवर अपलोड करतील.
  • शहरी भागात – अर्ज स्वीकारणे आणि तपासणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका व मुख्य सेविकांकडे असेल.

■ अर्जाची पडताळणी

  • ग्रामीण भागातील अर्जांची पडताळणी बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) करतील.
  • शहरी भागातील अर्जांची पडताळणी बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) करतील.
  • पडताळणी झाल्यानंतर अर्ज सक्षम अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी सादर केले जातील.

■ अंतिम मंजुरी

  • अर्जांना अंतिम मंजुरी संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) देतील.
  • मुंबई आणि मुंबई उपनगरातील अर्जांना मंजुरी देण्याची जबाबदारी नोडल अधिकारी यांच्याकडे असेल.
  • मंजूर झालेली यादी नंतर महिला व बालविकास आयुक्त यांना सादर केली जाईल.

■ समित्या आणि अंमलबजावणी

  • राज्यस्तरावर – महिला व बालविकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे.
  • अंमलबजावणीसाठी – महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी समिती कार्यरत आहे.

■ लाभ हस्तांतरण प्रक्रिया

  • मंजूर लाभ थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे लाभार्थ्यांच्या संयुक्त बँक खात्यात जमा होईल.
  • हे खाते मुलगी आणि आईच्या नावावर असेल.
  • जर आईचा मृत्यू झाला असेल तर आईचे मृत्यू प्रमाणपत्र जोडून खाते मुलगी आणि वडील यांच्या नावाने उघडता येईल.

 टीप: अर्ज करताना अचूक माहिती व सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे अत्यंत महत्वाचे आहे. अधिकृत मार्गदर्शनासाठी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा महिला व बालविकास कार्यालय येथे संपर्क साधावा.


वाचकहो, Aflatooon.com ला Instagram इंस्टाग्राम वर फॉलो करताय ना?… अजूनही फॉलो केलं नसेल तर येथे क्लिक करा आणि मिळवा भन्नाट अपडेट्स, बातम्या आणि खास माहिती थेट तुमच्या फीडमध्ये!